👉जादा दराने विक्री करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
👉जिल्ह्यातील खरीप हंगाम पूर्व तयारीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर :- खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खते वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे. निविष्ठांचा तुटवडा भासणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. जादा दराने निविष्ठा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर अंकुश ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांनी जागरूकपणे काम करावे. असे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पंडीत जवाहरलाल नेहरू सभागृहात जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा बैठक २०२३-२४ महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार सदाशिवराव लोखंडे, आमदार लहू कानडे, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, विभागीय कृषी सहसंचालक रफीक नाईकवाडे, आत्माचे प्रकल्प संचालक विलास नलगे, कृषी उपसंचालक राजाराम गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे आदी उपस्थित होते.
खरीप हंगामात कृषी विभागाने घ्यावयाच्या दक्षतेबाबत पालकमंत्री श्री. विखे-पाटील यांनी सूचना दिल्या. ते म्हणाले की, जादा दराने खत विक्री करणे, खतांचा साठा करून ठेवणे, लिंकिंग करणे असे अवैध काम करणाऱ्या विक्रेत्यांवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. तालुका कृषी अधिकारी व कृषी सहायक यांच्यावर जबाबदारी निश्चित करून अवैध विक्रीला पायबंद घालावा. प्रत्येक दुकानाबाहेर निविष्ठा उपलब्धतेचे बोर्ड लावण्यात यावे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी त्यांच्या तक्रारींच्या निराकरणासाठी टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात यावा.
शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बॅंकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करण्यात यावा. आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षानिमित्त जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना भरडधान्य लागवड करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा मासिक आढावा नियमितपणे घेण्यात यावा. राहूरी कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी शेतकऱ्यांशी संवादावर भर द्यावा. मागेल त्याला फळबाग, शेततळे, अस्तरीकरण, ठिंबक सिंचन व शेडनेट या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट असल्याचे ही श्री.विखे-पाटील यांनी यावेळी सांगितले.
प्रत्येक तालुक्यात मागील तीन वर्षापेक्षा जास्त कृषी पीक उत्पादन वाढले पाहिजे यासाठी कृषी अधिकारी व विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
जलयुक्त शिवार टप्पा – २ योजनेसाठी जिल्ह्यात २५७ गावांची निवड करण्यात आली आहे. यापुढे अधिक उत्साहाने ही योजना राबविण्यात यावी. एक रूपयात पीक विमा योजना राबविण्यात अहमदनगर जिल्ह्याचा राज्यात प्रथम क्रमांक आला पाहिजे. अशी अपेक्षा ही पालकमंत्री श्री.विखे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी खरीप हंगामात कृषी विभागाने केलेल्या नियोजनाबाबतचे सादरीकरण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले. जिल्ह्यातील पीक उत्पादन, कृषी पतपुरवठा, पीक विमा योजना, आपत्कालीन पीक नियोजन , अतिवृष्टीचे शासन अनुदान, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना याविषयावर श्री. बोराळे यांनी बैठकीत सादरीकरण केले.
बैठकीपूर्वी, महसूलमंत्र्यांच्या हस्ते उन्नत शेती, समृध्द शेतकरी मोहिमेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजनेत अहमदनगर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असुन या योजनेत 51 शेतक-यांना ट्रॅक्टरचे व 2 हॉर्वेस्टरचे वाटप करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी मंगल शिंदे, दिपक ढगे, सुभाष कर्डीले, बाबुराव धनगर, शांताराम बारामते, विक्रम अकोलकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कमीत कमी दिवसांत अधिक उत्पादन देणाऱ्या राजस्थान येथील मटकी वाणाचे पाच शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी व राहूरी कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक व कृषी सहायक उपस्थित होते.