खंडणीसाठी दीपक परदेशी यांचे अपहरण करून बडतर्फ पोलिसाने केला खून ः दोघांना पोलिसांनी केले अटक

मृतदेह बायपास रोडवर सिमेंटच्या बंदिस्त नालीत टाकला; 24 फेब्रुवारीपासून होते बेपत्ता

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः शहरातून 24 फेब्रुवारीपासून बेपत्ता असलेले परदेशी मळा, बोल्हेगाव येथील रहिवाशी उद्योजक दीपक लालसिंग परदेशी (वय 68) यांचा मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत निंबळक बायपास रोडच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या बंदिस्त नालीत 17 मार्चला आढळून आला आहे. त्यांचा एका बडतर्फ पोलिसाने त्याच्या एका सहकार्‍याच्या मदतीने 10 कोटींच्या खंडणीसाठी दोरीने गळा आवळून खुन केल्याचे पोलिस तपासात आढळून आले असून, पोलिसांनी दोघांना अटक करत त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.


किरण बबन कोळपे (वय 38, रा. विळद, ता. नगर) असे या बडतर्फ पोलिस कर्मचार्‍याचे नाव असून, कोळपे याने त्याचा साथीदार सागर गीताराम मोरे (रा. ब्राम्हणी, ता. राहुरी) याच्या मदतीने परदेशी यांचा खुन केला असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक अमोल गायधनी यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, उद्योजक दीपक लालसिंग परदेशी हे 24 फेब्रुवारीपासून बेपत्ता झाले होते. याबाबत 25 फेब्रुवारीला तोफखाना पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल झाली होती. त्याचा तपास पो.हे.कॉ. दिनेश मोरे यांच्याकडे देण्यात आलेला होता. त्यानंतर शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक यांच्या आदेशानुसार मिसींगचा पुढील तपास 3 मार्चपासून उपनिरीक्षक अमोल गायधनी यांच्याकडे वर्ग केल्याने बेपत्ता परदेशी यांचा शोध घेण्याकामी गायधनी यांच्यासह स.पो.नि. उज्वलसिंग राजपुत, पो.हे.कॉ. सुरज वाबळे, पो.हे.कॉ. दिपक जाधव, पो. कॉ. सतिष त्रिभुवन असे करत होते.
सी.सी.टी.व्ही फुटेजने पोहचवले आरोपीपर्यंत बेपत्ता परदेशी यांचा शोध घेत असताना या पथकाने दि.24 फेब्रुवारी रोजीचे नायरा पेट्रोल पंप, बोल्हेगाव, एका घराचे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोल्हेगाव येथील सी.सी.टी.व्ही फुटेज प्राप्त केले होते. सदर सी.सी.टी.व्ही फुटेजची बारकाईने पाहणी करताना दिपक परदेशी हे त्यांच्या मोटारसायकलवरुन घराच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे दिपक परदेशी यांच्या पाठोपाठ येणार्‍या वाहनांची बारकाईने पाहणी करता दुपारी 2.30 ते 3 वाजेदरम्यानचे नायरा पेट्रोल पंप येथील सी.सी.टी.व्ही फुटेजमध्ये पांढर्‍या रंगाची टाटा इंडीका कार परदेशी यांच्या पाठोपाठ जात असल्याचे दिसुन आले. परंतु त्याच रोडवरील पुढील एका घराचे सी.सी.टी.व्ही फुटेजमध्ये पांढर्‍या रंगाची इंडीका कार दोन ते तीन मिनीटे उशीराने येत असल्याचे दिसून आले.
आरोपींनी असा केला परदेशी यांचा खुन उद्योजक परदेशी यांची आरोपी किरण कोळपेशी ओळख
होती. काही दिवसांपूर्वी परदेशी यांनी कोळपे यास बोलावून त्यांचे विळद गावातील काही लोकांकडे पैसे आहेत, ते वसूल करून देण्याचे काम सांगितले. याबाबत कोळपे याने त्याचा साथीदार सागर मोरे यास बोलावून घेत सांगितले. परंतु विळद गावातील लोकांकडून पैसे वसूल करणे अवघड असल्याने त्या दोघांनी परदेशी यांनाच उचलून त्यांच्याकडून अधिक पैसे मिळवायचा प्लॅन केला. त्यानुसार 24 फेब्रुवारीला दोघांनी इंडिका कारने परदेशी यांचा घरापर्यंत पाठलाग केला. त्यांना त्यांच्या घराबाहेरून कारमध्ये बसवून निंबळकच्या दिशेने व पुढे नगर-मनमाड महामार्गावर घेवून गेले. त्यावेळी कार कोळपे चालवत होता.
परदेशी त्याच्या शेजारी पुढील सीटवर बसलेले होते तर सागर मोरे पाठीमागे बसलेला होता. ठरल्याप्रमाणे कोळपे याने परदेशी यांना 10 कोटी रुपये मागितले व मोरे यास त्यांचे हात पाठीमागून धरून ठेवायला लावले. त्यावेळी परदेशी हे झटापट करायला लागले असता, अगोदरच कारमध्ये असलेल्या नायलॉन दोरीने त्यांचा गळा आवळला. परदेशी यांनी झटापट करत कारचा दरवाजा उघडला असता कोळपे याने त्यांचे हात पाय दोरीने घट्ट बांधले. परदेशी यांनी पैसे न दिल्याने विळद घाटाजवळ सागर मोरे याने त्यांचा गळा दोरीने घट्ट आवळून त्यांना जीवे ठार मारले. त्यानंतर कोणाला कळू नये म्हणून त्याच दिवशी रात्री 8.30 च्या सुमारास दोघांनी परदेशी यांचा मृतदेह निंबळक बायपास रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या बंदिस्त नालीत टाकला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!