कोतवाली पोलिस ठाणे: हॉटेलमध्ये ए.सी. लावण्यातून भांडणे
Nagar Reporter
अहमदनगर : हॉटेलमध्ये वेटरशी झालेल्या भांडणातून ७ जणांनी हॉटेलमध्ये गोंधळ घालत मालकास धमकावले. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, स्वास्तिक चौकातील हॉटेल रेडियन्स येथे दि. १० रोजी रात्री ८.१५ वाजता वेटरने ए.सी. लावला नाही, या कारणावरून ग्राहकाने वाद सुरू केला आहे. या घटनेचा राग मनात धरून वरील चारचाकी गाडीतून (एमएच १२ एफपी ३९९०) सात जण आले. त्यामधील आरोपी अजय बेरड याने हातात लाकडी दांडका घेऊन हॉटेल व्यावसायिक विनायक दत्तात्रय रासकोंडा (वय ४२, रा. वरवंडे गल्ली, माळीवाडा) शिवीगाळ केली तर लखन करांडे याने धमकी दिली.
रासकोंडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी लखन रावसाहेब करांडे (रा. दरेवाडी, ता. नगर), अभिषेक मधूकर तांबे, नितीन शिवाजी वाघ (दोघे रा. पिंपळगाव उज्जैनी, ता. नगर) अजय जगन बेरड (रा. दरेवाडी, ता. नगर) व ३ अनोळखी व्यक्तीविरूद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोतवाली पोलिस ठाणे: घरखाली करण्यासाठी महिलेस मारहाण
Nagar Reporter
अहमदनगर : घर खाली केले नाही, म्हणून दोन पुतणे, मुलगा व दिराने शिवीगाळ करून एका पुतण्याने खिडकीच्या पाईपने महिलेस मारहाण केली. ही घटना दि.८ रोजी रात्री ८.३० वाजता मल्हार चौक, स्टेशन रस्ता येथे घडली.
पुतण्या राहुल विजय पुरी, गौरव विजय पुरी, मुलगा यश संजय पुरी व दीर विजय गुरूचरण पुरी ( सर्व रा. कोळगाव, ता. श्रीगोंदे) यांच्याविरूध्द कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला ही मल्हार चौक, स्टेशन रोड येथील घरात एकटी असताना राहुल पुरी, गौरव पुरी, यश पुरी व विजय पुरी हे घरी आले. घर खाली केले नाही म्हणून त्यांनी शिवीगाळ केली. गौरव पुरी याने घरातील खिडकीचा पडदा लावण्याच्या पाईपने हाताच्या दंडावर व डाव्या पायाच्या अंगठ्यावर मारहाण करून दुखापत केली. या महिलेने दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नगर तालुका पोलिस ठाणे : टेम्पोच्या धडकेने वृद्ध ठार
Nagar Reporter
अहमदनगर : आयशर टेम्पोने रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाला जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन तो जागीच ठार झाला. अहमदनगर – पुणे महामार्गावर कामरगाव (ता.नगर) गावचे शिवारात असलेल्या अभिजित मंगल कार्यालया समोर बुधवारी (दि.१०) दुपारी साडे बाराच्या सुमारास हा अपघात झाला.
अशोक खंडू सोनवणे (वय ५९, रा. बेल्हे, ता. जुन्नर, जि.पुणे) असे मृत वृद्धाचे नाव आहे. सोनवणे हे बुधवारी (दि.१०) दुपारी साडे बाराच्या सुमारास कामरगाव (ता.नगर) गावच्या शिवारात असलेल्या अभिजित मंगल कार्यालया समोर रस्ता ओलांडत असताना जावेद अहमद पठाण (रा.रहीमपूर, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) यांने त्याचे ताब्यातील पांढरे रंगाचा आयशर टेम्पो (एम.एच.२० सीटी ७१२३) भरधाव वेगात चालवत सोनवणे यांना जोराची धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की, सोनवणे हे रस्त्यावर लांब फेकले गेले. त्यामुळे ते गंभीररित्या जखमी होऊन जागीच मृत झाले. याबाबत मृत सोनवणे यांचा मुलगा सचिन अशोक सोनवणे (वय-३६) यांनी गुरुवारी (दि.११) नगर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी टेम्पो चालक जावेद पठाण याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.