कौडगावाच्या तिघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, एक अटक ; नगर तालुका पोलिसांची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर : शेतजमिनीच्या हद्दीतून नेहमीच भांडणे करुन जातीवाचक शिवीगाळा करुन त्रास देत असल्याप्रकरणी नगर तालुक्यातील कौडगाव येथील तिघांवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ या कलमानुसार ॲट्रॉसिटीचा गुन्हा नगर तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी तिघांपैकी राम परसाम खर्से यास अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता, पुढील तपासासाठी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर तालुक्यातील कौडगाव येथे आई सुलोचना, पत्नी प्रियांका, ३ मुले असे एकत्र कुटुंब आहे. आमची कौडगाव शिवारात शेती गट नं.८९ अ व ८९ ब एकूण एक एकर शेतजमीन आहे. त्या शेतजमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून माझं कुटुंब उदरनिर्वाह चालवत आहे. पण आमच्या शेजारी असणारे राम परसाम खर्से असणारे कुटुंब हे आमच्याबरोबर नेहमीच शेतीच्या हद्दीवरुन भांडणे घालीत आहेत. या त्रासाला कंटाळून शेतजमिनीची सरकारी मोजणी भुमि अभिलेख कार्यालयामार्फत केली. आमची सरकारी मोजणी केली असता, ८९ ब ची जमीन १३ गुंठे ही परसाम तुकाराम खर्से यांच्या नं. १०६ यांच्या कब्जात व ८९ अ ८ गुंठे जमीन गट नं.९० यांच्याकडे ८ गुंठे जगन्नाथ ऊर्फ कचरु जिजाबा खर्से यांच्या कब्जात असल्याचे मोजणीत दिसून आले आहे. त्यानंतर मी वेळोवेळी परसाम तुकाराम खर्से, राम परसाम खर्से, गोकुळ आदिनाथ खर्से यांना माझ्या जमिनीचा ताबा देणेबाबत विनंती केली. परंतु जमिनीचा ताबा न देता भांडण करून आमचा जाण्या-येण्याचा रस्ता अडवून जातीवाचक शिवीगाळा करीत आहेत, या विक्रम भाऊसाहेब पाटोळे (रा.कौडगाव ता.जि.अहिल्यानगर) यांच्या फिर्यादीवरून राम परसाम खर्से, परसाम तुकाराम खर्से, गोकुळ आदिनाथ खर्से ( तिघे रा.कौडगाव, ता.जि.अहिल्यानगर) या तिघांवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती ( अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ व भारतीय न्याय संहिता (बीएन एस) २०२३ कलमानुसार नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाखल गुन्ह्यानुसार राम परसाम खर्से या एकास नगर तालुका पोलिसांनी अटक केली असून त्यास न्यायालयात हजर केले आहे.