नाशिक गुन्हे शाखा युनिट क्र.2 ची कामगिरी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
कोपरगाव ः दारूमधून ब्लडप्रेशर व झोपेच्या जास्त प्रमाणात गोळ्या मिसळून त्यास दारू पाजली. त्यांची शुध्द हरपल्याचा अंदाज घेऊन गाडी थांबवून त्यास कोपरगाव रस्त्याच्या कडेला फेकून देऊन पळून गेल्याचे तपासात उघड झाले आहे. यामुळे 14 महिन्यापूर्वी दाखल असलेल्या अकस्मात मुत्यू हा खूनच असल्याचे समोर आले आहे. या तपासाची मोलाची कामगिरी गुन्हेशाखा युनिट क्र. 2 नी बजावली आहे.
नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखा पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके, नाशिक शहर वरिष्ठ पोनि विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र.2 चे सपोनि समाधान हिरे, सपोउपनिरी यशवंत बेंडकोळी, पोहवा मनोहर शिंदे, प्रकाश महाजन, चंद्रकांत गवळी, वाल्मीक चव्हाण, पोअं विशाल कुंवर, समाधान वाजे, तेजस मते, महेश खांडबहाले, स्वप्नील जुंद्रे आदिंच्या टिमने ही कामगिरी केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात क्रमांक 44/23 दि. 28 जून 2023 रोजी प्रमाणे दाखल होता. या अकस्मातमधील मयत अभिजीत राजेंद्र सांबरे (रा.राजरत्ननगर, सिडको, नाशिक) याचा मृत्यू संशयास्पद झाला असल्याबाबत त्याच्या नातेवाईक यांचे सांगणे होते. या संशयास्प्द मुत्यू त्याच्यासोबत असणारा प्रमोद जालिंदर रणमाळे याने घडवून आणला असल्याबाबत संशय होता. याकरीता गुन्हेशाखा, युनिट क्र.2 चे पोहवा मनोहर शिंदे यांनी या अकस्मात मुत्यूबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यातील संशयित प्रमोद जालिंदर रणमाळे यास पोलीस अंमलदार विशाल कुंवर, सोमनाथ वाजे, तेजस मते, महेश खांडबहाले यांनी शिताफिने ताब्यात घेतले. संशयित प्रमोद जालिंदर रणमाळे यास वरिष्ठ पोनि विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि समाधान हिरे यांनी तपास कौशल्य, अ.मू.चे पेपर अवलोकन, तांत्रीक विश्लेषण वापरून विचारपूस करता प्रमोद जालिंदर रणमाळे याने यातील मयत अभिजीत सांबरे हा त्याचा मित्र होता. त्याच्या यापूर्वीपासून पैश्यांचे व्यवहार होते. त्यातून त्यांचा वाद विकोपास गेला होता. त्यामुळे संशयित प्रमोद रणमाळे याने मयत अभिजीत सांबरे यास मारण्याबाबत डाव आखलेला होता. दि.27 जून 2023 रोजी आर्थिक व्यवहाराकरीता यातील मयत हा येवला (जि. नाशिक) येथे जाणार होता. त्याने संशयित प्रमोद रणमाळे यास देखील ठिकाणी येण्याबाबत कळविले होते. संशयित प्रमोद रणमाळे याने यातील मयत अभिजीत सांबरे याच्या दारू पिण्याच्या सवयीचा फायदा घेऊन रात्री 9 वाजण्याच्या सुमारास त्यास दारूमधून ब्लडप्रेशर व झोपेच्या जास्त गोळया मिसळून त्यास दारू पाजली. त्यातून मयत अभिजीत सांबरे याची शारीरिक परिस्थिती गंभीर होत असतांना त्यास त्याच्या बुलेट गाडीवर मागे बसून येवला येथून संभाजीनगरकडे जाणा-या रस्त्याने वैजापूरगावाजवळून कोपरगाव रस्त्याने घेऊन गेला. मयत अभिजीत सांबरे याची शुध्द हरपल्याचा अंदाज घेऊन आरोपी याने गाडी थांबवून त्यास कोपरगाव रस्त्याचे कडेला फेकून देऊन पळून गेला, तशी कबुली आरोपी प्रमोद जालिंदर रणमाळे याने दिली आहे. त्याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुरनं.307/24 भादंविक 302 प्रमाणे दाखल झाला. पुढील तपासकामी कोपरगाव तालुका पोलीस करीत आहेत.