कायदेविषयक जनजागृती शिबीर, मोफत डिजिटल सातबारा , ई-पीक पाहणी कार्यक्रमाचे आयोजन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी – “समाजात कायदेविषयक जनजागृतीची गरज आहे. राज्यघटनेवर भारताची न्यायव्यवस्था आधारलेले आहे. तेव्हा भारतीय राज्यघटनेसोबत कायदेविषयक ज्ञान प्रत्येक नागरिकांनी प्राप्त केल्यास आपआपसातील वाद, तंटे समापचोराने मिटतील.” असे प्रतिपादन शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी आज येथे केले.
तालुका विधी सेवा समिती कोपरगाव अंतर्गत असलेल्या राहाता न्यायालय व राहाता वकिलसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने शनिवार,दि.09 ऑक्टोंबर रोजी कणकुरी, डोऱ्हाळे व वाळकी या गावांमध्ये कायदेविषयक जनजागृतीपर शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना श्री.शिंदे बोलत होते. याप्रसंगी कनकुरी गावाचे सरपंच ज्ञानेश्वर डांगे, ॲड. विकास डांगे, ॲड. राहूल गोंदकर, ॲड. शुभम गोंदकर, अधीक्षक आर.एम.लोहाटे, सहायक अधीक्षक डी.बी.बिदे तसेच डोऱ्हाळे व वाळकी गावाचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री.शिंदे म्हणाले, “भारताच्या अमृत महोत्सवानिमित्ताने विधी सेवा समितीच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. लोकअदालत, कायदेविषयक जनजागृती सारखे उपक्रम स्तुत्य असे आहेत. 14 ऑक्टोंबर 2021 पर्यंत तालुक्यातील गावागावात असे कायदेविषयक शिबीरे आयोजित केली जाणार आहेत. या शिबीरांचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा. “असे आवाहन ही श्री.शिंदे यांनी यावेळी केले.
यावेळी वाळकी व डोऱ्हाळे गावांतील शेतकऱ्यांना श्री.शिंदे यांच्याहस्ते डिजिटल सातबाराचे मोफत वितरण करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना महसूल विभागाच्या महत्त्वाकांक्षी अशा ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाची माहिती देण्यात आली. ॲड्राईड मोबाईलच्या माध्यमातून ‘ई-पीक पाहणी’ कशी करावी. याबाबत तांत्रिक माहिती देण्यात आली. या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन ॲड.एस.बी.जपे यांनी केले.