संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर : महाविकास आघाडी सरकारच्या वतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी महाराष्ट्र बंद मध्ये नगर शहरामध्ये काँग्रेस, शिवसेना संयुक्तरीत्या सहभागी झाली मात्र राष्ट्रवादी एकाकी पडल्याचे चित्र या निमित्ताने पाहायला मिळाले. काँग्रेस, शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इम्पेरियल चौक येथील पुतळ्यापाशी काही वेळासाठी रास्ता रोको करत निषेध सभा घेतली. नगर तालुका महाविकास आघाडीचे नेते देखील यामध्ये सहभागी झाले होते.
सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे ,शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, महापौर रोहिणी शेंडगे, विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, अनिस चूडीवाला, माजी महापौर भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, नगर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संपतराव मस्के, बाबासाहेब गुंजाळ, बाळासाहेब हराळ आदींसह काँग्रेस, शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या निमित्ताने तीनही पक्ष एकत्र असले तरी देखील नगर शहरामध्ये आणि नगर तालुक्यामध्ये कर्डिले, जगताप विरोधक एक असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळाले. शनिवारी काँग्रेस व शिवसेनेने पत्रकार परिषद घेत तसेच प्रसिद्धीपत्रकाद्वारे संयुक्तरित्या महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी होण्याबाबतचे आधीच जाहीर केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी होण्याबाबत जाहीर केले होते. काँग्रेस, शिवसेनेने एकत्र येत आज महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी झाल्यामुळे नगर शहरात राष्ट्रवादी मात्र एकाकी पडल्याचे पाहायला मिळाले. शहरात राष्ट्रवादीचे दोन- दोन आमदार असून देखील काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येत दोन्ही आमदारांना एकाकी पाडल्याची चर्चा यामुळे शहरांमध्ये सुरू होती.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर म्हणाले की, अत्यंत निंदनीय कृत्य हे देशातील सरकारचे सुरू आहे. यामुळे शेतकरी उध्वस्त होत असून शेतकऱ्यांच्या अंगावरती गाड्या घालने ही कृती अत्यंत संतापजनक आहे. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले की, लखिमपुरची घटना ही मोदी सरकारचा बुरखा फाडणारी आहे. त्यांना शेतकर्याला चिरडून काढायचे असून मुठभर उद्योगपतींच्या हातामध्ये हा देश द्यायचा आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे नसून उद्योगपतींचे आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वतीने आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो.
शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते म्हणाले की, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्याच्याच जीवावर केंद्रातील सरकार उठले आहे. शेतकरी मोडून पडला तर देश मोडून पडेल. त्यामुळे आम्ही महविकास आघाडी म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके म्हणाले की, भाजपप्रणित सरकार असणाऱ्या राज्यांमध्ये त्या सर्वांनी केंद्र सरकारच्या वतीने दडपशाहीचे राजकारण सुरू आहे. देश पेटून उठला आहे अशा गोष्टींना आता जनताच भिक घालणार नाही.
यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काँग्रेसचे अज्जू भाई शेख, मुबीन शेख, अन्वर सय्यद,महिला काँग्रेसच्या उषाताई भगत, जरीना पठाण, शारदा वाघमारे, शकीला शेख, कौसर खान, मागासवर्गीय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष नाथा अल्लाट, मोहनराव वाकुरे, हनीफ शेख, शिवसेनेचे आकाश कातोरे, परेश लोखंडे, काका शेळके आदी यावेळी उपस्थित होते.
बंदला व्यापाऱ्यांचा ही पाठिंबा
किरण काळे म्हणाले की, आम्ही सर्व व्यापारी संघटनांशी बोललो आहोत. कोरोनामुळे आधीच सगळ्यांचं मोठ आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यातच दिवसभर दुकान बंद ठेवणं हे व्यापाऱ्यांसाठी देखील गैरसोयीचा आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी दिवसभर दुकान बंद ठेवावीत अशा प्रकारची अपेक्षा ठेवणे योग्य नाही. परंतु सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील महाविकास आघाडी सरकारच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला समर्थन असल्याचे आम्हाला सांगितले आहे.