संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
कर्जत – राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या राशीन येथील जगदंबा देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची रिघ लागलेली असते.मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर येथील लाखो भक्तांच्या सुरक्षिततेबरोबरच प्रत्येकाला सुलभ दर्शन घेता यावे, यासाठी कर्जतचे उपक्रमशील पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केलेल्या विशेष नियोजनाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
श्री. यादव यांच्या संकल्पनेतून जगदंबादेवी मंदिर परिसरात नियोजित बॅरिकेटिंग करून दर्शनासाठी येण्यासाठी एक व दर्शन करून बाहेर पडण्यासाठी दुसरा मार्ग असे दर्शनबारीचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यभराच्या विविध भागातून येणाऱ्या विविध वाहनांसाठी म्हणजेच ट्राफिक नियंत्रणासाठी मंदिराच्या दक्षिण व उत्तर गेटच्या ठिकाणी एक रेषा केल्याने सर्व वाहनांची पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. भाविकांनी दर्शनासाठी मुख्य गाभाऱ्यात जाऊन गर्दी करण्यापेक्षा व कोरोनाचा धोका टाळण्यासाठी आत न जाता मंदिराच्या पितळी दरवाजाजवळच भाविक-भक्तांची दर्शनाची सोय केल्याने अगदी कमी वेळेत दर्शन होत आहे. महिलांना खूप मोठा गर्दीमध्ये खूप वेळेस असुरक्षितता वाटायची ती आता वाटत नसल्याच्या भावना भाविकांनी, महिलांनी व्यक्त केल्या. दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांनी समक्ष तसेच फोन करून कर्जत पोलिसांचे कौतुक केले. विशेष म्हणजे यामुळे गर्दीचे प्रमाण खुप कमी आहे. मंदिराचे मानकरी व सेवेकरी आदींच्या वेळोवेळी बैठका घेतल्याने मंदिरात आरतीसाठी व इतर विधीसाठी गर्दी न होता मोजकेच भाविक जात आहेत. अनेक भाविकांमुळे मंदिरासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने मंदिरासमोरील दुकानदारांना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी समजावुन सांगितल्याने मंदिरासमोरील अतिक्रमण काढण्यात आले आहे त्यामुळे या ठिकाणी गर्दी न होता मोठा रस्ता खुला झाल्याने गर्दीला मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे.राज्यभरातून येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीकोनातून मंदिर प्रशासनास पत्रव्यवहार करून मंदिराच्या सर्व ठिकाणी भाविकांना मास्क व सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यास विनंती केली आहे. राशीन चे नागरिक, राशीन देवस्थान ट्रस्ट आणि राशीन आणि जवळच्या सर्व वाड्या आणि गावातील सर्व पदाधिकारी यांनीही मोठे सहकार्य याकामी केले. राशीनच्या मंदिर परीसरात दर्शनासाठी करण्यात आलेल्या नियोजनाचे व कर्जत पोलिसांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक होत आहे.
हे सर्व नियोजनबद्ध जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोनि चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार सपोनि दिनकर मुंडे, पोउपनि भगवान शिरसाठ, पोकाॅ तुळशीदास सातपुते, मारुती काळे, संभाजी वाबळे, गणेश ठोंबरे, सागर म्हेत्रे, गणेश भागडे, संपत शिंदे, भाऊ काळे, मनोज लातूरकर, बाळासाहेब यादव, राहुल खरात, गोवर्धन कदम, बळीराम काकडे, नितीन नरोटे, शकील बेग आणि गृहरक्षक दलाचे जवान आदिंनी रोज काम करत आहेत.
“दरवर्षी राशीन येथे नवरात्रीला राज्यभरातून भाविकांची गर्दी होते मात्र ही गर्दी नियंत्रणात आणणे कठीण होऊन जाते मात्र कर्जत पोलिसांनी यावेळी दर्शनबारीसाठी उत्कृष्ट नियोजन केले आहे.अत्यंत कमी वेळेत व व्यवस्थित दर्शन होत आहे.असे नियोजन याअगोदर पहावयास मिळाले नाही”.
👆 – नवीन बोरा, व्यावसायिक राशीन
“श्रद्धास्थान असलेल्या राशीनच्या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी आम्ही दरवर्षी सहकुटुंब येत असतो.कोरोनाची पार्श्वभूमी असतानाही कोणताही धोका जाणवला नाही.यंदाचे दर्शनबारीचे नियोजन खुपच सुंदर वाटले.असे नियोजन आता दरवर्षी होणे गरजेचे आहे”.
👆 – गणेश सुर्यवंशी,कल्याण मुंबई