संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : अहमदनगर येथील एका खुनाच्या खटल्यात आरोपीच्या वकिलांनी साक्षीदारांची समाधानकारक उलट तपासणी घेतली नसल्याचे औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. जी. अवचट आणि न्या. आर. एम. जोशी यांच्या अपिलाच्या सुनावणीच्या वेळेस निदर्शनास आले आहे. खंडपीठाने या खटल्यात साक्षीदारांची उलट तपासणी पुन्हा जिल्हा सत्र न्यायालयाने घेण्याचा आदेश दिला आहे. फौजदारी खटल्यातील तज्ञ वकील म्हणून ॲड. सतीशचंद्र सुद्रिक यांची वकील म्हणून नियुक्ती केली आहे.
अहमदनगर- औरंगाबाद महामार्गावर २०१५ मध्ये शेंडी (ता.नगर) शिवारातील दावल मलिक डोंगर परिसरात एका तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली होती. स्वप्निल ढवळे (वय १९, रा. वांबोरी, ता. राहुरी) यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.
ढवळे यांनी ॲड. अभय ओस्तवाल यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात या शिक्षेविरोधात अपिल दाखल केले. ॲड. ओस्तवाल यांनी या खटल्यातील अनेक त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. या खटल्यात आरोपीच्या वकिलांनी समाधानकारक उलट तपासणी साक्षीदारांची घेतली नसल्याचे न्यायमूर्तीचे मत झाले. एमआयडीसीचे तत्कालिन सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुलकमार पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत पाठक आणि मुद्देमाल पंच साक्षीदार अभिषेक पालवे यांची फेरउलट तपासणी नोंदविण्याचा आदेश जिल्हा सत्र न्यायालयास दिली आहे. फौजदारी खटल्यातील तज्ञ वकील म्हणून ॲड. सतीशचंद्र सुद्रिक यांची वकील म्हणून नियुक्ती केली आहे.