ऑनलाक चा निर्णय मुख्यमंत्री घेणार : वडेट्टीवार


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर

मुंबई- मी या खात्याचा मंत्री आहे, तसेच आपत्कालीन विभागाच्या समितीचा मी सदस्य आहे. या समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री असले तरीही बैठकीत मिळालेल्या मान्यतेच्या गोष्टी जाहीर करणे माझा अधिकार आहे. राज्यातील ज्या जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे, अशा ठिकाणी टप्प्याटप्प्याने अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत तत्वतः मान्यता दिली आहे. मी आधीच्या पत्रकार परिषदेत तत्वतः बोलायचे राहून गेले असाही त्यांनी खुलासा केला.
राज्याच्या आपत्कालीन विभागाच्या बैठकीत महाराष्ट्रात ज्या भागात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे, अशा ठिकाणी अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यासाठी तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. पण याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करतील अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे आणि बेड्सची संख्या उपलब्ध आहे अशा ठिकाणी १८ जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन हटवण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. पण हा निर्णय आल्यानंतरच या अनलॉकची प्रक्रिया सुरू होईल असे वडेट्टीवार यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री कार्यालयामार्फत राज्यातील निर्बंध उठवण्यात आलेले नाहीत असे स्पष्टीकरण आल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी संपुर्ण प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच शुक्रवारपासून पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये अनलॉक प्रक्रिया होणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात  काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ब्रेक दि चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे,या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील, असे शासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अनलॉक प्रक्रियेचे पाच टप्पे जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून हे स्पष्टीकरण आले आहे. विजय वडेट्टीवार यांनी पहिल्या टप्प्याअंतर्गतच काही जिल्ह्यांमध्ये अनलॉक प्रक्रियेला ४ जूनपासूनच सुरूवात होईल असे स्पष्ट केले होते.
अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून  पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून  याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते उपरोक्त शासननिर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल असे मुख्यमंत्री कार्यालयाद्वारे स्पष्ट करण्यात आले.

जाणून घ्या पाच टप्पे
👉पहिला टप्पा – ५ टक्के पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची क्षमता २५ टक्क्यांपेक्षा कमी असायला पाहिजे. या पहिल्या टप्प्यात एकूण १८ जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये औरंगाबाद, भंडारा,बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ हे जिल्हे आहे. येथे लॉकडाऊन हटवण्यात येणार आहे.
👉दुसरा टप्पा – ५ टक्के पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची क्षमता २५ ते ४० टक्के असायला पाहिजे. या टप्प्यात ५ जिल्ह्यांचा समावेश आहे. अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर आणि नंदूरबार. या टप्प्यामध्ये काही निर्बंध अंशतः शिथिल करण्यात येतील.
👉तिसरा टप्पा – ५ ते १० टक्के पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची क्षमता ४० टक्क्यांपेक्षा जास्त असायला पाहिजे. या तिसऱ्या टप्प्यात १० जिल्ह्यांचा समावेश आहे. अकोला, बीड, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधूदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद.
👉चौथा टप्पा – १० ते २० दरम्यान पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची क्षमता ६० टक्क्यांपेक्षा जास्त पाहिजे. यामध्ये २ जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे, रायगड.
👉पाचवा टप्पा – २० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची क्षमता ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाहिजे. १० जिल्हे पाचव्या टप्प्या असणार आहे.

 

 



Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!