संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षकास प्रवासा दरम्यान मारहाण करणाऱ्या एकास अटक केली. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली सेलेरीओ कारही जप्त करण्याची कारवाई एमआयडीसी पोलिसांनी केली. त्या आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. संकेत वस ( पुणे) असे आरोपीचे नाव आहे.
एसपी राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीण डिवायएसपी अजित पाटील यांच्या मार्गर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर,पोलीस अंमलदार नंदकुमार सांगळे, सुरेश सानप, किशोर जाधव, रेवनाथ दहिफळे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, गुन्ह्यात वापरलेली सेलेरीओ कार एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात, दि. २८ मार्च २०२३ ला बुलढाणा येथील पोलीस उपनिरीक्षक दिनेश प्रल्हाद शिरेकर हे नगर तालुक्यातील औरंगाबाद-नगर महामार्गावरती शेंडी येथे त्यांचे कुटुंबीयांसोबत थांबले होते. या दरम्यान दोन अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्या पायावर मोठा दगड टाकून गंभीर जखमी केले होते. त्यामध्ये त्यांचे दोन्ही पायांची हाडे फ्रॅक्चर झालेली होती. या घटनेबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात येथे गुरन २५४/२३ भादवि कलम ३२५, ३२३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. घटनेची माहिती मिळताच ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन एमआयडीसीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना तपास कामी सूचना देऊन पथक तयार करून घटनेतील आरोपीचा जलद तपास करून आरोपींना ताब्यात घ्या, अशा सूचना दिल्या होत्या. या घटनेतील अज्ञात इसमाचा तपास सुरू असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना तपासामध्ये आरोपी संकेत वस हा पुणे येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी तात्काळ पथक तयार करून पुणे येथे रवाना केले. पुणे येथील राहत्या घरून ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता घटनेतील आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. घटनेतील दुसऱ्या आरोपीचा एमआयडीसी पोलीस शोध घेत आहेत.