संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई ः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. यानंतर उद्या म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. मात्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असताना महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून निकालाचा अंदाज बांधला जात आहे. तसेच एक्झिट पोलचे आकडेही समोर आले असून महायुतीची सत्ता येत असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही महाविकास आघाडीला किती जागा मिळतील, याचा आकडा सांगितला आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या लागणार असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून बैठकांचे आयोजन करून आपल्या उमेदवारांशी संवाद साधला जात आहे. तसेच त्यांना सूचना दिल्या जात आहेत. शरद पवार यांनीही आपल्या उमेदवारांसोबत संवाद साधण्यासाठी ऑनलाइन बैठक बोलावली होती. या बैठकीत एक्झिट पोलवरही चर्चा करण्यात आली. यावेळी शरद पवारांनी आपल्या उमेदवारांना एक्झिट पोलचं टेंशन न घेण्याचा सल्ला दिला. तसेच महाविकास आघाडीच्या 157 जागा येतील, असा विश्वासही व्यक्त केला.
उमेदवारांना आदेश देताना शरद पवार म्हणाले की, जोवर निकाल लागत नाही, तोवर मतमोजणी केंद्र सोडायचे नाही. तसेच जिंकल्यावर प्रमाणपत्र घेऊन थेट मुंबई गाठण्याची व्यवस्था करून ठेवा. याशिवाय ग्रामीण भागातून येणार्या आमदारांची राहण्याची व्यवस्था मविआकडून करण्यात आली आहे, असेही शरद पवार म्हणाले.
निकालानंतर राज्यातील चित्र होईल स्पष्ट
दरम्यान, निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर समोर आलेल्या बहुतांश एक्झिट पोलनी महायुतीला बहुमत मिळले आणि त्यांची सत्ता येईल, असे म्हटले आहे. राज्यात सत्तास्थापनेसाठी 145 जागांची आवश्यकता आहे. मात्र आता शरद पवारांनी मविआला 157 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याचा अर्थ सत्तास्थापनेला लागणार्या आकड्यापेक्षा 12 जागा जास्त मिळतील, असा दावाच त्यांनी केला आहे. त्यामुळे आता महायुती, अपक्ष आणि इतर पक्षांना उर्वरीत जागा मिळण्याचा अंदाज आता बांधला जात आहे. त्यामुळे आता उद्या, शनिवारी (23 नोव्हेंबर) विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यावर राज्यातील चित्र स्पष्ट होईल.