संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी ः निवडणूक लढविणार्या उमेदवाराच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल असा द्वेषपूर्ण प्रचार प्रतिस्पर्धी उमेदवारांनी करू नये, असे आवाहन नेवासा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक अरूणकुमार यांनी केले.
नेवासा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविणार्या उमेदवारांच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी अरूण उंडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय बिरादार उपस्थित होते.
श्री.अरूणकुमार म्हणाले, आदर्श आचारसंहितेचे अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्याचे काम प्रशासन करत असते. आचारसंहितेचे पालन करण्याची जबाबदारी निवडणूक लढविणार्या उमेदवारांची आहे. तेव्हा आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही. यांची दक्षता घेण्यात यावी. प्रचार करतांना वैयक्तिक टीका-टिपण्णी करू नये. निवडणूकीत येणार खर्चाचा अहवाल प्रत्येक उमेदवाराला वेळोवेळी निवडणूक प्रशासनाकडे सादर करणे बंधनकारक आहे, असेही त्यांनी सांगितले.
निवडणूक निर्णय अधिकारी श्री.उंडे म्हणाले, प्रचार व प्रसिद्धीकामी विविध प्रकारच्या 10 परवानग्या घेणे आवश्यक आहे. या परवानग्या नेवासा तहसील कार्यालयातील एक खिडकी कक्षामार्फत ऑफलाईन देण्यात येतील व ऑनलाईन परवानग्या ह्या सुविधा पोर्टलवरुन घेता येतील. समाज माध्यमावरील प्रचाराच्या परवानग्या अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयातील एमसीएमसी कक्षामार्फत घेता येतील.
यावेळी उमेदवारांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅट बाबत प्राथमिक माहिती देण्यात आली. दुसरी सरमिसळ प्रक्रिया झाल्यानंतर कोणते मतदान यंत्र कोणत्या केंद्रावर जातील, हे निश्चित होईल, असेही यावेळी सांगण्यात आले.