👉शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाले असून, चिन्हासाठी निवडणूक आयोगानं तीन पर्याय देण्यास सांगितले आहे.
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
mumbai मुंबईः निवडणूक आयोगाकडून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाला नवीन नावं बहाल करण्यात आली आहेत. उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आले तर, मशाल हे चिन्ह मिळाले आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाले असून, चिन्हासाठी निवडणूक आयोगानं तीन पर्याय देण्यास सांगितले आहे.
विशेष म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेत शिवसेना हे नाव वापरण्यावर तात्पुरती बंदी घातली होती. यानंतर अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल या तीन चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. तर शिंदे गटाने आज त्रिशूळ, गदा आणि उगवता सूर्य ही चिन्ह निवडणूक आयोगाकडे पाठवली होती. मात्र निवडणूक आयोगाने आता ‘त्रिशूळ’ आणि ‘गदा’ चिन्ह बाद करत दोन्ही गटाला पुन्हा मोठा धक्का दिला आहे. धार्मिक चिन्ह असल्याचे म्हणत आयोगानं ही दोन्ही चिन्ह नाकारली आहेत.
यानंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देत ‘मशाल’ हे चिन्ह बहाल केले आहेत. तर शिंदे गटाला चिन्हासाठी तीन पर्याय देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात शिंदे गटाला नावांच्या तीन पर्यायांपैकी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव वापरण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे तर ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव वापरण्यास परवानगी दिली आहे.