संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी- सध्या जगात ‘फाईव्ह-जी’चा बोलबाला असला, तरीही रेशनवरील धान्य वितरण करण्यासाठी वापरण्यात येणार्या ‘ई-पॉस’ मशीन मात्र टू-जीच्या काळात आहे. यामुळे डोंगरळा भागात असल्याने अनेक ठिकाणी रेंज मिळत नाही, धान्य वितरणात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहे. या तांत्रिक अडचणीमुळे डोंगर भागातील रेशनपासून अनेकांना वंचित राहावे लागत आहे.
चिंचपुर पांगुळ, जोगेवाडी, ढाकनवाडी, वडगांव, मानेेवाडी, पिंपळगांव टप्पा ही पाथर्डी तालुक्यातील गांवे जिल्ह्याच्या हद्दीवर दुर्गम भागात आहेत. त्यामुळे रेशनचे धान्य प्रत्येक महिन्यात दुकानदारांकडेच उशिराने येते. अन् त्याची ग्राहकांना वितरणाची मुदतही अनेकदा संपुष्टात आलेली असते. त्यामुळे वेळेत धान्याचे वितरण न झाल्यास ते धान्य तसेच परत करावे लागते.
त्यातच गेल्या तीन ते चार महिन्यापासून ई-पॉस मशीनचा सर्वर डाऊन होत असल्या कारणाने परिसरातील लोकांना रोजगार बुडवून धान्य घेण्यासाठी दिवस-दिवस बसूनही अनेक हेलपाटे मारावे लागतात तरी सुद्धा धान्य मिळत नाही.
परिणामी दुकानदारांसह शिधापत्रिकाधारक त्रस्त झाले असून, ई-पॉस मशीन्स अद्ययावत कराव्यात.लोकांना मालाची पावतीही मिळत नाही.
कारण सदर मशीन खराब झाल्या कारणाने त्यातून पावती काढण्यास अडचणी येत आहेत.त्यातच आधी एकावेळी अंगठा दिल्यावर मोफत आणि विकतचं असा दोन्हीही प्रकारचे रेशन घेता येत होते. परंतु आता वेगवेगळा अंगठा द्यावा लागतो. त्यामुळे आणखीनच समस्या निर्माण होत आहेत.
रेशन धान्यातील काळाबाजाराला चाप लावण्यासाठी शासनाने ऑनलाईन धान्य वितरणाची प्रणाली विकसित केली. बायोमेट्रीकद्वारे धान्य वितरण सुरू केले. त्यासाठी ई-पॉस मशीनची जोड दिली. मात्र, काळानुरुप हे मशीन बदलणे किंवा अद्ययावत करणे गरजेचे असताना तसे झालेच नाही. त्यामुळे फोरजी, फाईव्ह जीच्या युगात टू-जी इंटरनेट स्पीडला सपोर्ट करणार्या ई-पॉसद्वारेच धान्याचे वाटप ग्राहकांना करावे लागत आहे.
नेटवर्क मिळत नसल्याने धान्य वितरण करताना मोठ्या अडचणींचा सामना दुकानदारांना करावा लागत आहे. ग्राहकही यामुळे त्रस्त झाला असून, दुकानदारांशी त्यांचे वादही होतात. त्यामुळे त्वरीत या मशीनची समस्या निकाली काढण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे.अशी मागणी केली जात आहे.
👉🏻संकलन-सोमराज बडे