संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
राहुरी : येथील मुळानदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरुध्द अहमदनगर एलसीबी विभागाने चांगलाच कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईत एलसीबी टिम’ने दोन टेम्पो व ४ ब्रास वाळू असा ६ लाख ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. गणेश बाबासाहेब त्रिभुवन (वय ३१, रा. राहुरी स्टेशन, ता. राहुरी), करण अनिल जाधव (वय १९, रा. आरडगांव, ता. राहुरी) यांना ताब्यात घेण्यात आले आहेत.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक श्रीमती. स्वाती भोर मॅडम व श्रीरामपूर डिवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार पोना सचिन आडबल, विशाल गवांदे, पोकॉ शिवाजी ढाकणे, आकाश काळे व चापोहेकॉ संभाजी कोतकर आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याआदेशान्वये एलसीबी टिम’ने राहुरी तालुक्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरुध्द कारवाई करण्याकरीता पेट्रोलिंग करत असतांना एलसीबी पोनि दिनेश आहेर यांना माहिती मिळाली, गणेश त्रिभुवन, अजय बर्डे हे दोन वेगवेगळ्या टेम्पोतून तांदुळवाडी ठाणे (ता. राहुरी) येथे मुळा नदीपात्रात मजुरांच्या सहाय्याने अवैध वाळू उत्खनन करुन वाळू टेम्पोमध्ये भरुन चोरुन वाळू वाहतूक करत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीनुसार पोनि श्री आहेर यांनी ती
एलसीबी टिम’ला देऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. सूचनेप्रमाणे एलसीबी टिम’ने पंचांसह तांदुळवाडी ठाणे (ता. राहुरी) येथील मुळा नदीपात्रात जाऊ आडोशाला थांबून खात्री केली असता मुळा नदीपात्रातुन मजुराच्या सहाय्याने दोन टेम्पोमध्ये वाळू भरतांना दिसले. एलसीबी टिम’ला व पंचांची खात्री होताच अचानक छापा टाकला. या दरम्यान पकडण्याच्या तयारीत असताना मजुर पोलीसांना पाहून काटवनात पळून गेले. दोन्ही टेम्पोमध्ये बसलेल्या चालकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे वाळू वाहतुकीचे परवान्याबाबत विचारपुस केली. यावेळी त्यांनी त्यांच्याकडे शासनाचा वाळू उत्खनन-उपसा किंवा वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याबाबत सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे गणेश बाबासाहेब त्रिभुवन व करण अनिल जाधव असे सांगितली. त्यांच्याकडे टेम्पो मालकाबाबत विचारले असता, त्यांनी टेम्पो हा अजय बर्डे (रा. देसवंडी, ता. राहुरी) याच्या मालकीचा असल्याचे सांगितले. पळून गेलेल्या मजुरांचा शोध घेतला परंतु ते मिळून आले नाहीत.
ताब्यात घेतलेल्यांनी अवैधरित्या राहुरी येथील मुळानदी पात्रातून शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता किंवा रॉयल्टी न भरता शासकिय मालकिची वाळू अवैध उत्खनन व चोरी करुन पर्यावरणाचे नुकसान होईल, असे कृत्य केल्याने ६ लाख ४० हजार रुपये किंमतीचे दोन टेम्पो व चार ब्रास वाळुसह ताब्यात घेऊन त्याच्याविरुध्द राहुरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३६२/२०२३ भादविक ३७९,३४ सह पर्यावरण कायदा कलम ३,१५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहे.