अहिल्यानगरातून अपहरण करून डोंगरात जाळून टाकले ; अटक चौघांची कबुली
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर – शहरातील तपोवन रस्ता परिसरातून मागील शनिवारी (दि.२२ फेब्रुवारी २०२५) ला अपहरण करण्यात आलेल्या तरुणास एमआयडीसी परिसरातील केकताई डोंगरात जाळून टाकून त्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे. वैभव शिवाजी नायकोडी (वय १९, रा. ढवणवस्ती, तपोवन रोड, सावेडी) असे त्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, त्याचे अपहरण करणाऱ्या चौघांना तोफखाना पोलिसांनी अटक केली होती. त्यांनी वैभव याला जाळून टाकल्याची कबुली दिली आहे.
तपोवन रस्त्यावरील सलूनच्या दुकानाजवळून चारचाकी मोटारीतून आलेल्या चौघांनी वैभव नायकोडी याचे अपहरण करून पळून नेले. त्यातील एकाचे नाव लपका (रा. बोल्हेगाव) असे होते. ही घटना २२ फेब्रुवारी २०२५ घडली. याबाबत सिमा शिवाजी नायकोडी (रा. ढवणवस्ती, सावेडी) यांनी २७ फेब्रुवारी रोजी तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली होती. फिर्याद दाखल होताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक उज्ज्वलसिंग रजपूत यांच्या पथकाने अपहरण करणाऱ्या चौघांना एमआयडीसी परिसरातून अटक केली. अनिकेत उर्फ लपका विजय सोमवंशी (वय २३, रा. एमआयडीसी, नवनागापूर, ता. जि. अहिल्यानगर), सुमित बाळासाहेब थोरात (वय २४, रा. गजानन कॉलनी, नवनागापूर), महेश मारोतीराव पाटील (वय २६, रा. शिवाजीनगर, नवनागापूर, जि. अहिल्यानगर), नितीन उर्फ निशिकांत अशोक नन्नवरे (वय २५, रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) अशी त्यांची नावे आहेत. त्या चौघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तोफखाना व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्या चौघांकडे वैभव नायकोडी याच्या विषयी चौकशी केली असता त्याला आम्ही २३ फेब्रुवारी रोजी मारहाण करून एमआयडीसी परिसरातील केकताई डोंगरात जाळून टाकले आहे, अशी कबुली काल शनिवारी (१ मार्च) रोजी पोलिसांसमोर दिली. तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल अपहरणाच्या गुन्ह्यात वाढीव खूनाचे कलम लावण्यात आले आहे. दरम्यान आरोपींनी कबुली देताच पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोनि आनंद कोकरे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि माणिक चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली.