अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट : 38 जणांना फाशी

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदाबाद –
अहमदाबादला दि.२६ जुलै 2008 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामधील दोषींना शुक्रवारी (दि.१८) शिक्षा सुनावण्यात आली. ३८ दोषींना फाशी व ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दि.८ फेब्रुवारी रोजी सिटी सिव्हिल कोर्टाने ७८ पैकी ४९ आरोपींना UAPA (अनलॉफुल अॅक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन अॅक्ट) अंतर्गत दोषी ठरवले होते. अयाज सय्यद या दोषींपैकी एकाला तपासात मदत केल्याबद्दल निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. याशिवाय २९ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना एक लाख, गंभीर जखमींना ५० हजार आणि किरकोळ जखमींना २५ हजार रुपये देण्यात येतील, असे न्यायालयाने म्हटले आहे.
दि.२६ जुलै २००८ हा तो दिवस होता जेव्हा ७० मिनिटांच्या कालावधीत २१ बॉम्बस्फोटांनी अहमदाबादचा आत्मा हादरला होता. शहरात झालेल्या या बॉम्बस्फोटांमध्ये ५६ जणांचा मृत्यू झाला, तर २०० लोक जखमी झाले होते. बॉम्बस्फोटांचा तपास अनेक वर्षे चालला आणि सुमारे ८० आरोपींवर खटला चालवण्यात आला. पोलिसांनी अहमदाबादमध्ये २० एफआयआर नोंदवले होते, तर सुरतमध्ये आणखी १५ एफआयआर नोंदवण्यात आले होते, जिथे विविध ठिकाणांहून जिवंत बॉम्बही जप्त करण्यात आले होते.
स्फोटांनंतर, गुजरातच्या सुरत पोलिसांनी दि.२८ जुलै ते दि.३१ जुलै २००८ दरम्यान शहरातील विविध भागांतून २९ बॉम्ब जप्त केले होते. ज्यामध्ये १७ वराछा परिसरातून आणि इतर कतारगाम, महिधरपुरा आणि उमरा भागात होते. चुकीचे सर्किट आणि डिटोनेटरमुळे या बॉम्बचा स्फोट होऊ शकला नसल्याचे तपासात समोर आले होते.
👉गोध्रा घटनेला प्रत्युत्तर म्हणून बॉम्बस्फोट करण्यात आले होते.
इंडियन मुजाहिदीन (IM) आणि प्रतिबंधित स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (SIMI) या दहशतवादी संघटनेशी संबंधित लोकांनी हे स्फोट घडवून आणले. स्फोटाच्या काही मिनिटांपूर्वी टेलिव्हिजन चॅनल आणि प्रसारमाध्यमांना ‘इंडियन मुजाहिदीन’ने बॉम्बस्फोटाचा इशारा देणारा ई-मेल पाठवला होता. 2002 मधील गोध्रा दंगलीला प्रत्युत्तर म्हणून आयएमच्या दहशतवाद्यांनी हे स्फोट घडवून आणल्याचे पोलिसांचे मानने होते. या प्रकरणातील आणखी एक आरोपी यासीन भटकळ याच्याविरुद्ध पोलिस नव्याने गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत.
डीजीपी आशिष भाटिया यांच्या नेतृत्वाखाली विशेष टीम तयार करण्यात आली होती
गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आदेशावरून जेसीपी क्राइमच्या नेतृत्वाखाली अहमदाबाद क्राइम ब्रांचची विशेष टीम तयार करण्यात आली होती. डीजीपी आशिष भाटिया यांनी या पथकाचे नेतृत्व केले. त्याचवेळी या टीममध्ये अभय चुडास्मा (DCP क्राईम) आणि हिमांशू शुक्ला (ASP हिम्मतनगर) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणांचा तपास तत्कालीन डीएसपी राजेंद्र असारी, मयूर चावडा, उषा राडा आणि व्हीआर टोलिया यांच्याकडे सोपवण्यात आला होता. अहमदाबाद क्राइम ब्रांचच्या या विशेष पथकाने 19 दिवसांत या प्रकरणाचा पर्दाफाश केला आणि १५ ऑगस्ट २००८  रोजी पहिली अटक केली.
७८ आरोपींविरुद्ध खटला सुरू होता
न्यायालयाने सर्व ३५ एफआयआर एकत्रित केल्यानंतर डिसेंबर २००९ मध्ये ७८ आरोपींविरुद्ध खटला सुरू झाला. एक आरोपी नंतर सरकारी साक्षीदार झाला. या प्रकरणात नंतर आणखी चार आरोपींनाही अटक करण्यात आली होती, परंतु त्यांचा खटला अद्याप सुरू झालेला नाही. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने ११०० साक्षीदार तपासले. सरकारी वकिलांमध्ये एचएम ध्रुव, सुधीर ब्रह्मभट्ट, अमित पटेल आणि मितेश अमीन, तर बचाव पक्षाचे वकील एमएम शेख आणि खालिद शेख आदींचा समावेश होता.
१९ दिवसांत ३० दहशतवादी पकडले
विशेष पथकाने अवघ्या १९ दिवसांत ३० दहशतवाद्यांना पकडून तुरुंगात पाठवले होते. यानंतर उर्वरित दहशतवादी देशातील विविध शहरांतून पकडले जात राहिले. अहमदाबादमधील बॉम्बस्फोटांपूर्वी इंडियन मुजाहिद्दीनच्या याच टीमने जयपूर आणि वाराणसीमध्येही स्फोट घडवून आणले होते. देशातील अनेक राज्यांचे पोलिस त्यांना पकडण्यात गुंतले होते, पण ते एकामागून एक ब्लास्ट करत गेले. अहमदाबाद बॉम्बस्फोटाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ जुलैला सुरतमध्येही साखळी बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, पण टायमरमध्ये बिघाड झाल्यामुळे ते स्फोट होऊ शकले नाहीत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!