संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – शेअर ट्रेडींगमध्ये पैसे गुंतवून अधिक नफा मिळवून देण्याचे अमीष दाखवत नगरमधील एका व्यावसायिकाची ७ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत नगर मधील व्यावसायिक शहबाज रऊफ सय्यद (रा.पोलिस कॉलनी, सूर्यानगर) यांनी नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि.६) दुपारी फिर्याद दिली आहे. फिर्यादी सय्यद हे व्यावसायिक असून त्यांच्याशी ऋषीकेश साहेबा जोगदंड या नावाच्या इसमाने संपर्क साधून शेअर ट्रेडींग मधील गुंतवणूकीर्तील व त्यातून मिळणाऱ्या नफ्याबाबत माहिती दिली. सय्यद यांचा विश्वास संपादन करुन १३ ऑगस्ट २०२१ ते १४ जुलै २०२२ या कालावधीत त्यांच्याकडून फोन पेवर वेळोवेळी ७ लाख ५ हजार रुपये घेतले. त्यानंतर वर्ष होत आले तरी १ रुपयाही न दिल्यामुळे त्यांनी सय्यद यांनी जोगदंड यास फोन करुन पैसे परत देण्याची मागणी केली. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अनेकदा फोन करुनही पैसे परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे सय्यद यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी गुरुवारी (दि.६) दुपारी सायबर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली.
या फिर्यादीवरुन पोलिसांनी ऋषीकेश साहेबा जोगदंड नावाच्या व्यक्ती विरोधात भा.दं.वि.क. ४१९, ४२०, माहिती तंत्रज्ञान कलम ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सायबर पोलिस ठाण्याचे पो.नि. दिनेश आहेर हे करीत आहेत.