संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
जामखेड : येथून महाराष्ट्र राज्यात विक्री प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखु विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगून वाहतूक करणाऱ्या तिघांना पकडले. त्यांच्याकडून १४ लाख ३४ हजार रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे.
राजु विठ्ठल शिंदे (वय ३०, रा. चौसळा, जि. बीड), मोहित सुभाष मिसाळ (वय १९), योगेश सुखदेव खाडे (वय १९, दोन्ही रा. आनंदवाडी, ता. जामखेड) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, कर्जत डिवायएसपी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनुसार पोहेकॉ मनोहर गोसावी, संदीप पवार, पोना सचिन आडबल, पोकॉ रणजीत जाधव, शिवाजी ढाकणे, रोहित मिसाळ व प्रशांत राठोड आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, एलसीबी टिम’ने माहिती ठिकाणी लोहारदेवी मंदीराजवळील मोकळे मैदानाजवळ जावून खात्री केली असता एका अशोक लेलंड छोट्या टेम्पोमधून तीनजण काही गोण्या या टोम्पोजवळच उभ्या असलेल्या पांढरे रंगाचे स्कॉर्पीटो गाडीमध्ये भरताना दिसले. पथकाची खात्री होताच अचानक छापा टाकून त्यांना जागीच पकडून पोलिसांची ओळख सांगितली. दोन्ही वाहनांची पंचा समक्ष झडती घेता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला हिरागुटखा, पानमसाला व रॉयल तंबाखू असल्याची खात्री झाल्याने तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता टेम्पो चालकाने त्याचे नाव राजु विठ्ठल शिंदे (रा. चौसळा, जि. बीड), मोहित सुभाष मिसाळ, योगेश सुखदेव खाडे ( दोन्ही रा. आनंदवाडी, ता. जामखेड) असे सांगितले. टेम्पो चालक आरोपी राजु शिंदे यास टेम्पोमधील मुद्देमालाबाबत विचारपुस करता त्याने सदर माल हा कर्नाटक येथील शेट्टी याच्याकडून ४६ गोण्या हिरा गुटखा, पानमसाला विकत आणून त्यापैकी ३० गोण्या या मंझीरी (ता. पाटोदा, जि. बीड) येथील गिते पूर्ण नाव माहित नाही यांना दिल्या व १६ गोण्या या विनोद छबु तोंडे, (रा. बीड रोड, ता. जामखेड (फरार) यांनी विक्री करण्याच्या उद्देशाने मागविला होत्या असे सांगितले. व आरोपी मोहित मिसाळ याचेकडे विचारपुस करता त्याने हिरा गुटखा, पानमसाला व तंबाखुच्या १६ गोण्या विनोद तोंडे याने स्कॉर्पीओमध्ये भरुन घेऊन येण्यास सांगितले अशी कबुली दिली.
तीन आरोपींचे ताब्यातून ९ लाख ९२ हजार रु. किंमतीचा हिरा गुटखा, पानमसाला, ४२ हजार रु. किंमतीची रॉयल तंबाखु, ६ लाख रु. किंमतीची अशोक लेलंड कंपनीचा मालवाह टेम्पो व ६ लाख रु. किंमतीची स्कॉर्पीओ गाडी असा एकुण १४ लाख ३४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल बेकायदेशिररित्या कब्जात बाळगून विक्री करण्याचे उद्देशाने वाहतूक करताना मिळून आला, या एलसीबीचे पोकॉ रणजीत जाधव यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. २३२/२०२३ भादविक ३२८, १८८, २७२, २७३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जामखेड पोलीस करीत आहे. आरोपीचे फरार साथीदाराचा त्याचे राहत्या घरी जाऊन शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही.