👉विविध कार्यक्रमांचे आयोजन ; नागरिकांनी उपस्थित राहण्याचे एसपी मनोज पाटील यांचे आवाहन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – नाशिक परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या संकल्पनेतून व अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या विशेष पुढाकारातून अहमदनगर जिल्हा पोलीस दलाचे वतीने मंगळवार दि.५ जुलै २०२२ रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अहमदनगर जिल्हा पोलीस दलाचे वतीने दि. २६ जून २०२२ रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त पंधरवाड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.५ जुलै २०२२ रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी रॅली, पथनाट्य, व्यसनमुक्ती बॅनर्स प्रदर्शन, माहिती पत्रिकेचे वाटप व मान्यवरांचे व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास पद्मश्री पोपटराव पवार, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, डॉ. श्री. गिरीष कुलकर्णी, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, मानसोपचार तज्ञ डॉ. श्रीमती दिप्ती करंदिकर, राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण जिल्हा सल्लागार हर्षल पटारे व परिघर व्यसनमुक्ती केंद्राचे मानसोपचार तज्ञ, मधुकर काळे आदि मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन जनजागृती कार्यक्रम याप्रमाणे सकाळी १०.३० रॅली ठिकाण तोफखाना पोलीस स्टेशन प्रोफेसर चौक माऊली संकुल, अहमदनगर, प्रोफेसर चौक अहमदनगर येथे पथनाट्य, प्रदर्शनाचे उद्घाटन व विद्यार्थाना राष्ट्रीय कार्यक्रमाची माहिती पत्रिकेचे वाटप होईल.
यानंतर माऊली संकुल येथे मान्यवर उपस्थितींना मार्गदर्शन करणार आहे. या महत्त्वपूर्ण जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन कार्यक्रमास नागरिकांनी मंगळवारी (दि.५ जुलै) सकाळी १०.३० वा. मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जनजागृती मोहिमेत सहभागी व्हावेत, असे आवाहन अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांनी केले आहे.