संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : वैयक्तिक वादातून मनात राग धरुन समोराच्या त्या कुटूंबियांना पोलीसांकडून त्रास देण्याच्या उद्देशाने मुंबई येथे दुबईवरुन पहाटे तिघे आले आहेत. ते अतिरेकी असून, त्यांचा पाकीस्तानशी संबंध आहे, अशी खोटी माहिती मुंबई मुख्य नियंत्रण कक्ष यांना देणारा अहमदनगरच्या एकास नाशिक दहशतवाद विरोधी पथकाच्या युनिटने ताब्यात घेतले आहे. अहमदनगर येथील यासिन याकुब सय्यद असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.७ एप्रिल २०२३ ला मुंबई मुख्य नियंत्रण कक्ष यांना दुपारी १२.५ वाजण्याच्या सुमारास मुख्य नियंत्रण कक्ष येथील दक्ष नागरीक बुथवर कॉलर राजा ठोंगे याने मोबाईलवरुन फोन करुन माहीती दिली की, मुंबई येथे दुबईवरुन पहाटे तिघे आले आहेत. ते अतिरेकी असून, त्यांचा पाकिस्तानशी संबंध आहे. त्यातील एका व्यक्तीचे नाव मुजिब मुस्तफा सय्यद, त्याचा मोबाईल क्रमांक व गाडी (कं.एम एच १६ बीझेड ८०३२) याचा दोन नंबरचा व्यवसाय आहे, असे कॉलरने कळवून ते पुण्यावरुन बोलत असल्याचे सांगितले होते. याबाबत हॉक्स कॉल झाला होता. या हॉक्स कॉल करणा-याविरुद्ध आझाद मैदान पोलीस ठाणे गुरनं ५३ / २०२३ भादवि कलम ५०५ (१) (ब), ५०६ (२), १८२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
राज्याच्या मुंबई दहशतवाद विरोधी पथकाचे अपर पोलीस महासंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल गुन्ह्याचा समांतर तपास नाशिक युनिट अधिकारी व अंमलदार करत होते. या गुन्ह्यामध्ये तांत्रिक विश्लेषण, सी.सी.टी.व्ही. फुटेज व गोपनिय बातमीदार यांच्यामार्फत तपास करत असताना मुजिब मुस्तफा सय्यद याचा चुलत भाऊ यासिन याकुब सय्यद याने मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती दिली होती, असे निष्पन्न झाले आहे.
खोटी माहिती देण्याचे कारण विचारले असता मुजीब सय्यद व आरोपी यासीन सय्यद यांचा भवानीनगर (अहमदनगर) येथे साडेपाच गुंठ्याचा वडीलोपार्जित सामाईक प्लॉट आहे. त्या प्लॉटच्या वादावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन मुजीब व त्याच्या कुटूंबियांना पोलीसांकडून त्रास व्हावा, या उद्देशाने खोटी माहिती देवून खोटी माहिती दिल्याची कबुली दिली आहे.
गुन्ह्यामध्ये आरोपीने कोणत्याही प्रकारचा पुरावा मागे राहणार नाही, याची दक्षता घेऊन थंड डोक्याने गुन्हा केला होता. परंतु दहशतवाद विरोधी पथक, नाशिक युनिट अधिकारी व अंमलदार यांनी वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे कौशल्यपूर्ण तपास करुन अल्पावधीतच गुन्हा उघडकीस आणला. या तपासाने जनमाणसातील सुरक्षिततेची भावना दहशतवाद विरोधी पथक, नाशिक युनिट कायम ठेवली आहे. अहमदनगर येथील आरोपी यासीन सय्यद याला ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई मुंबई आझाद मैदान पोलीस ठाणे हे करत आहेत.