अल्पवयीन मतीमंद मुलीवर अत्याचार करुन गर्भवती करणा-या आरोपीस १० वर्ष सक्त मजूरीची शिक्षा, दंड
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : पिडीत अल्पवयीन मतीमंद मुलीच्या भोळसर स्वभावाचा गैरफायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी मा. विशेष जिल्हा न्यायाधीश, श्रीमती माधुरी एच. मोरे यांनी आरोपीस भा.द. वि. कलम ३७६ (२) (जे) (एनएन) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा कलम ५ व ६ या अन्वये दोषी धरून आरोपीस बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा कलम ६ नुसार आरोपी सागर राजु पंचरास (वय २५, रा.जवळा, ता. पारनेर, जि. अहमदनगर) याला १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा तसेच दंड रू. ५ हजार दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून विशेष सरकारी वकील श्रीमती मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी काम पाहिले.
घटनेची थोडक्यात हकिकत अशी की,दि.१ सप्टेंबर २०१८ रोजी पिडीत अल्पवयीन मुलगी तिच्या आईने पारनेर पो. स्टे. येथे अज्ञात इसमा विरुध्द फिर्याद दिली होती की, तिची अल्पवयीन मुलीच्या शांत भोळसर स्वभावाचा गैरफायदा कोणीतरी अज्ञात इसमाने घेऊन पिडीत मुलीशी शरीर संबंध करुन तिला गरोदर केलेले होते. फिर्याद दाखल झाल्यानंतर घटनेचा तपास महिला पी.एस.आय., बोत्रे पी.एस.आय. राजेंद्र पवार तसेच महिला पी.एस.आय. कविता भुजबळ यांनी करुन आरोपी याचेसह इतर दोघांवर संशय व्यक्त करुन व वैदयकीय अहवाल प्राप्त केले होते सदर अहवालानुसार पिडीत मुलीची डिलिव्हरी झाल्यानंतर नवजात बालकाचा डी.एन.ए. हा आरोपीशी जुळुन आल्याने आरोपी विरुध्द दोषारोपपत्र दाखल केले होते.
खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकुण २५ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये अल्पवयीन पिडीत मुलगी मतीमंद असल्या संदर्भात मनोवैदयकीय अधिकारी तसेच पिडीत मुलीच्या उपचारा संदर्भातील वैदयकीय अधिकारी, त्याच बरोबर वयाबाबत मुख्याध्यापक तसेच सोनेवाडी येथील ग्रामसेवक याच बरोबर नाशिक येथील न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे रासायनिक विश्लेषक, आई, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी, यांची साक्ष नोंदविण्यात आली. तसेच पिडीत मुलगी ही अल्पवयीन असल्या बरोबर ती मतीमंद असल्याचे कोर्टाने निरिक्षण नोंदवलेले होते, या केसची सुनावणी चालु असताना सरकारी वकीलांनी युक्तीवाद केला की, आरोपी हा पिडीत मुलीचा नात्याने मेहुणा आहे. अल्पवयीन मुलीवर घरातील नात्यातील जवळच्या व्यक्तीने अत्याचार करण्याच्या घटना समाजामध्ये वाढत चाललेल्या आहेत. पिडीत मुलगी ही भोळसर स्वभावाची तसेच मतीमंद असल्याचा गैरफायदा आरोपी घेत होता. त्यामुळे केवळ १५ वर्षांची असलेली पिडीत मतीमंद अल्पवयीन मुलगी ही आरोपी पासुन गर्भवती राहीलेली आहे. तसेच या अल्पवयीन मुलीवर अत्यंत कमी वयामध्ये गर्भारपण व मातृत्व लादले गेलेले आहे. अशा परिस्थीतीत आरोपीस निर्देाष सोडणे हे पिडीत मुलगी व तिच्या कुटुंबीयांवर अन्यायकारक होईल, समाजातील वाईट प्रवृत्ती वाढीस लागून लहानग्या अल्पवयीन मुलांवर अशा घटना पुन्हा-पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी. सरकारी वकीलांचा युक्तीवाद तसेच आलेला संपूर्ण पुरावा ग्राहय धरून मा. न्यायालयाने आरोपीस वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली. सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील श्रीमती मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी पो.कॉ. अडसुळ, तसेच पारनेर स. फौ. शिवनाथ एन. बडे यांनी सहकार्य केले.