संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : कुठल्याही क्षेत्रातील कामाच्या यशस्वीतेमध्ये ज्ञानाचा फार मोठा वाटा असतो. त्यामुळे विधान परिषद पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी नियुक्त प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निवडणूक कायद्याचा व नियमांचा सखोल अभ्यास करुन ही निवडणूक निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या.

निवडणुकीच्या अनुषंगाने सहकार भवन येथे पहिल्या निवडणूक प्रशिक्षणसत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. भोसले बोलत होते.
यावेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, जिल्हा पुनर्वसन अधिकारी पल्लवी निर्मळ तहसिलदार उन्मेश पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीचे मतदान ईव्हीएमद्वारे न घेता मतपत्रिकेद्वारे करण्यात येते. त्यामुळे निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या निवडणुकीची प्रक्रिया अत्यंत बारकाईने समजुन घेणे गरजेचे आहे. निवडणुकीच्यापूर्वी सर्व अधिकारी,कर्मचाऱ्यांना तीन प्रशिक्षणाच्या माध्यमातून या निवडणुकीचे नियम,कायदे तसेच प्रकियेची सखोल माहिती देण्यात येणार असुन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या काही शंका असतील तर त्यांचे निरसनही या प्रशिक्षणामध्ये करुन घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
या निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष व तीन मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान प्रत्येक अधिकाऱ्याला वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली असुन आपल्याला देण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्य सोबत घेतले असल्याची खात्री करण्याबरोबरच यादरम्यान देण्यात येणारे अहवाल विहित नमुन्यातच भरुन पाठविले जातील, याचीही काळजी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.
पदवीधर निवडणूक मतपत्रिकेद्वारे घेण्यात येत असल्याने मतदानासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदाराला मतदानाची प्रक्रिया समाजवून सांगण्याबरोबरच मतदानाच्या गोपनीयतेचा भंग होणार नाही, यादृष्टीने पुरेशी काळजी घेण्याच्या सुचना करत निवडणुकीच्या प्रक्रियेची संपूर्ण माहितीही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिली.
यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी पल्लवी निर्मळ तहसिलदार उन्मेश पाटील यांनी पॉवर पॉईंटच्या माध्यमातून निवडणुक प्रक्रियेबाबतची माहिती उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिली.
या प्रशिक्षणास निवडणूक प्रक्रियेशी संबंधित जिल्ह्यातील विविध कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.