अजित पवार गटातील 12 बडे नेते भाजपात जाणार; महाराष्ट्रात तिसर्‍यांदा भूकंप?

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई : जसजशी निवडणुकांची तारीख जवळ येऊ घातली आहे, तसतसा राजकारणाला अधिकाधिक वेग येऊ लागला आहे. उद्धव गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी रविवारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्याची चर्चा थांबते न थांबते तोच पुन्हा एकदा नवीन दावा करण्यात आला आहे. नवीन दाव्यानुसार महाराष्ट्रात वेगवान घडामोडी घडणार आहेत. काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप घडणार असल्याचे संकेत दिले आहेत.
अतुल लोंढेंचा दावा काय?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून अजित पवार वेगळे झाले. आता पुन्हा त्यांच्यातही फूट पडू शकेल, असा अंदाज लोंढे यांनी व्यक्त केला आहे. अजित पवार गटातील धनंजय मुंडे, सुनील तटकरे, सुनील शेळके यांच्यासह अनेक बडे नेते भाजपात प्रवेश करतील आणि उरलेले नेते शरद पवार यांच्याकडे परत येतील, असा दावा अतुल लोंढे यांनी केला आहे. त्यामुळे अजित पवार एकटे पडू शकतात. भाजप सर्वांना धोका देईल, असं अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे. फुटलेल्या गटात पुन्हा अजून एक फूट पडणार आणि काही लोक भाजपात जाणार, असा दावा अतुल लोंढे यांनी केला आहे. अजित पवार गटातील 12 नेते हे भाजपात प्रवेश करतील, असा धक्कादाक दावा अतुल लोंढे यांनी केला आहे.
अतुल लोंढे यांच्या पोस्टमध्ये काय?
धोके पे धोका. ऐसा कोई सगा नहीं जिसे भाजपने ठगा नहीं. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 12 बडे नेते, मंत्री आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीचा दुसरा गट शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत जाणार, ही सूत्रांची माहिती असल्याचे सांगत अतुल लोंढे यांनी असा दावा एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात आता विविध चर्चांना उधाण आलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे सध्या प्रचंड घडामोडी घडत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत आहेत. महायुतीत तर जागावाटपावरुन मित्रपक्षांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे उमेदवारी घोषित होईपर्यंत या घडामोडींना जास्त महत्त्व असेल. महाराष्ट्राने दोन वर्षांपूर्वी राजकीय भूकंप पाहिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही तशीच फूट पडली.
अजित पवार गटाकडून अद्याप प्रतिक्रिया नाही
अजित पवार गटातले 12 बडे नेते भाजपात जाणार असल्याचा लोंढे यांचा दावा कितपत खरा आहे, हे आगामी काळात स्पष्ट होईलच. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अद्याप कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. लोंढे यांनी केलेल्या दाव्यामुळे सर्वत्र चर्चा मात्र रंगली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!