अखेर विनयभंग प्रकरणी डॉ. भास्कर मोरे अटक ;
नगर एलसीबीची पुणे जिल्ह्यात जाऊन कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
जामखेड : येथील मुलीचे विनयभंग प्रकरणी
रत्नदीप संस्थेचा संस्थापक अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यास स्थानिक गुन्हे शाखेने पळसदेव, भिगवण (ता. इंदापुर, जि. पुणे) येथे पकडले.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार एलसीबीचे सपोनि हेमंत थोरात, पोउनि तुषार धाकराव व पोलीस अंमलदार बबन मखरे, भाऊसाहेब काळे, रविंद्र कर्डीले, विशाल दळवी, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, सागर ससाणे, अमोल कोतकर, भाऊसाहेब राजू काळे, रोहित मिसाळ, प्रमोद जाधव, चंद्रकांत कुसळकर व अरुण मोरे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी (ता. जामखेड) संस्थापक अध्यक्ष भास्कर मोरे पाटील याने फार्मसी कॉलेजचे प्रिन्सीपल ऑफिसचे ऍ़न्टी चेंबरमध्ये बोलावून घेऊन पिडीतेशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. या घटनेबाबत दि.८ मार्च २०२४ रोजी जामखेड पो.स्टे.गु.र.नं. १०४/२०२४ भादविक ३५४,३५४ (अ) प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी मधील विद्यार्थींनी आरोपी संस्थापक अध्यक्ष भास्कर मोरे पाटील यास अटक करणे करीता जामखेड येथे उपोषणास बसल्या होत्या. या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन एसपी राकेश ओला यांनी पोनि श्री. आहेर यांना आरोपीचा शोध घेणे बाबत आदेशित केले होते. त्यानुसार एलसीबीची दोन विशेष पथके तयार करुन पथकास आरोपीची माहिती काढून त्यास ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हा शिक्षित व सधन असल्याने आरोपीचा शोध घेण्याचे पोलीसासमोर आव्हान होते. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे एका पथकाने आरोपीचे मित्र व नातेवाईक यांचेकडे जामखेड, श्रीगोंदा, कर्जत, बारामती, पुणे परिसरात चौकशी सुरु केली. दुसरे पथक हे तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपीचा शोध घेत होते. त्या दरम्यान असे लक्षात आले की, आरोपी हा वेगवेगळी ७-८ नवीन सिमकार्ड वापरुन पोलीसांना सुगावा लागू नये, याचा प्रयत्न करत होता.
पथकाने तांत्रिक विश्लेषण व नातेवाईकांकडे केलेल्या चौकशी दरम्यान पोनि श्री. आहेर यांना आरोपी भास्कर मोरे हा पळसदेव, भिगवण, जिल्हा पुणे येथे त्याचा नातेवाईक अशोक चव्हाण याच्याकडे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार दोन्ही पथके ही आरोपीचा नातेवाईक अशोक चव्हाण यांच्या राहत्या घरी पळसदेव, भिगवण येथे पोहचली असता नमुद आरोपी हा तेथून देखील पोलीस पथक पोहचण्याआधीच निघून गेल्याचे समजले. त्यानुसार पथकाने तात्काळ पळसदेव, भिगवण (ता. इंदापुर, जि. पुणे) येथील परिसरात आरोपीचा शोध घेता तो ऊसाचे शेतात लपून बसलेला मिळून आल्याने त्यास पथकाने ताब्यात घेतले. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगून त्याचे पूर्ण नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव भास्कर रामभाऊ मोरे (वय ५२, रा. जामखेड बस स्टॅण्ड मागे, ता. जामखेड) असे असल्याचे सांगितले. आरोपीस जामखेड पो.स्टे.गु.र.नं. १०४/२०२४ भादविक ३५४,३५४ (अ) या गुन्ह्याचे तपासकामी जामखेड पोलीस ठाण्यात येथे हजर करण्यात आले. पुढील तपास जामखेड पोलिस करत आहे.