भाग-३
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
यश साध्य करण्याचा प्रवासात असंख्य अडथळे समोर येत असतात. असे अडथळे आपल्याला स्वतःला आजमावण्याची संधी देतात. जसे आपण सद्गुणांचा विचार करतो तसेच आपल्या अंतर्मनातील काही दुबळे, वाईट गुणांचा ही जरुर विचार करावा कारण यशप्राप्तीच्या मार्गातील अडथळे दूर केल्याशिवाय पुढील वाटचाल सुखद व यशस्वी होऊ शकत नाही. अशा वाईट गुणांचा प्रथम निर्मूलन नाश करणे गरजेचे आहे.
◼️◼️◼️◼️◼️◼️
■ अंतर्मनातील वाईट गुणांचा नाश कराच!
👉लाजरेपणा – लाजरीवृत्ती यशाला नेहमी अडथळा आणते. ही एक तऱ्हेची भीतीच आहे. लाजरेपण चुकीच्या दिशेने चालण्याचे द्योतक आहे. धैर्याचा विकास करुन हा निषेधगुण त्यागणे अत्यंत जरुर आहे.
👉 भ्याडपणा हा दोष दुबळ्या हृदयाचा द्योतक आहे. लाजरेपणा नि भ्याडपणा एकाच माळेतील गोष्टी. अशा माणसाचे काळीज कमकुवत असते. सार्वजनिक वा इतर कोणत्याही धाडसाच्या कामाला हा अपात्र असतो. लहान विहिरीतील मोठ्या बेडकाप्रमाणे असतो हा. वरिष्ठाशी वा तिन्हाईताशी धीटपणाने बोलणे भ्याड माणसाला जमत नाही. अशा माणसाने समृध्द जीवनाची मुळीच अपेक्षा करु नये. भ्याडपणा हा मोठा शाप आहे. कोणत्याही परिस्थितीत हा दोष काढून टाकलाच पाहिजे.
👉 नैराश्य – ही एक न दुर्लक्षिता येणारी अनिष्ट गोष्ट आहे. जगातील भल्यापेक्षा वाईट गोष्टींकडेच याचे लक्ष असते. प्रत्येक बाबतीतील वाईट गोष्टच याच्या नजरेत भरते. नैराश्यग्रस्त व्यक्ती नेहमीच खचून गेलेला, आळसावलेला नि सुस्त असतो. आशावादी व्यक्ती प्रत्येक बाबीच्या प्रकाशमय भागाकडेच, चांगल्या बाजूकडेच पाहतो. नैराश्यग्रस्त व्यक्तीला संसर्गजन्य रोग झालेल्या माणसासारखा तो असतो. नैराश्याच्या रोगाची साथ मोठी भयंकर आहे. अशा तऱ्हेने नैराश्यने भरलेला व्यक्तीच्या जीवनात यश कधीही येत नाही. सामर्थ्यसंपन्न आशावादी बना नि स्वतःच्या उन्नतीसाठी कार्यमग्न जीवनाच्या कोणत्याही परिस्थितीत हसतमुख नि उत्साही रहा. व्हा.
👉भोळसटपणा • काही लोक अतिभोळसट असतात हे सुध्दा वाईट. अशा माणासाला कोणीही फसविते. तुमच्याजवळ असा भोळसटपणा असता उपयोगी नाही. व्यवसायात तर नकोच कारण प्रत्येक क्षणाला स्वनिर्णयातून पुढे जाते लागते. प्रत्येक व्यक्तीला पारखून घ्यावे लागते. त्याचा स्वभाव, पूर्वइतिहास, वागणूक इ. गोष्टी माहिती झाल्याखेरीज आपण त्याच्यावर टाकू शकत नाही. तरीही माणसाच्या स्वभागाचे अंतरंग त्याच्या चेहऱ्यावरुन जरुर कळते. बारीक निरीक्षण आणि परिक्षण केल्यानंतरच एखाद्या माणसावर विश्वास टाकावा.
👉संशयीवृत्ती – संशयात्मा विनश्यति । हे वचन लक्षात ठेवावे. भोळसटपणाच्या अगदी विरुध्द असलेली परंतु पूर्णाशाने दोषास्पद अशी ही गोष्ट आहे. मन नेहमी एकांतिक दृष्टीकोनाकडे झुकते. कौटुंबिक जीवनात तर पतीने पत्नीचा संशय घ्यावा नि पत्नीने पतीसंबंधी साशंक असावे, अशी रस्सीखेच कित्येक ठिकाणी चालू आहे. व्यवासायामध्येही नोकरांचा संशय घ्यावा. अशामुळे व्यवहार कसे घडतील? जग श्रध्देवर व विश्वासावर चालते. मालक परदेशात असले तरी इकडील व्यवहार सुरळीत चालतात ते मालकाचा नोकरावर विश्वास असतो म्हणूनच. माणसे जर एकमेकांचा संशय घेऊ लागली तर कुठलीच गोष्ट साध्य होणार नाही याउलट संघर्ष निर्माण होतील. काही बाबतीत विश्वास टाकूनच माणसाची पारख करायला हवी. भोळसटपणाही नको नि संशयी वृत्तीही नको, यातील सुवर्णमध्य हवा.
👉असहिष्णुता – असहिष्णुता हे हलक्या मनाचे लक्षण आहे. किरकोळ गोष्टीबाबत अकारण तिरस्कार हे असहिष्णुतेचे स्वरुपलक्षण. कुठल्या गोष्टीबद्दल किंवा व्यक्तीबद्दल अकारण तिरस्कार न करता प्रेमभाव निर्माण करा, तुमची मने उदार करा यामध्येच तुमचे यश अवलंबून आहे.
👉 न्यूनगंड – खूप माणसे स्वतःला कारणाविना इतरांपेक्षा तुच्छ लेखतात. हा झाला न्यूनगंड, याउलट अहंगंड असलेल्या लोकांची गोष्ट असते. अहंगंड वा न्यूनगंड या दोन्ही आपल्याच मनाच्या निर्मिती आहेत. सद्गुणांच्या विकासाने, अभ्यासाने स्वतःला तुच्छ लेखणारा मनुष्य श्रेष्ठपण प्राप्त करुन घेऊन नि स्वतःला मोठा समजणारा मनुष्य वाईट मार्गाला न लागता नम्र होईल. तुमच्यात न्यूनभावही नसावा नि अहंभावही नसावा. तुमची समत्वदृष्टी असावी. समत्वं योग उच्यते । हे लक्षात ठेवा.
👉औदासिन्य (दुर्मुखलेला) – काही लोकांकडे भरपूर पैसा असूनही ते खचलेले असतात. त्यांचा चेहरा चिडलेला नि दुर्मुखलेला असतो. हे औदासिन्य साथीच्या संसर्गजन्य रोगाप्रमाणेच आहे. असा मनुष्य कोणत्याही कार्याला उद्युक्त होत नाही, कार्याला वाहून घेत नाही. तो पूर्णपणाने आळशी बनतो. औदासिन्याने माणसाची शक्ती क्षय पावते. उत्साही व्हा, उत्साहाची नि आनंदाची कल्पना तुमच्या मनात साकार होऊ दे, दृढमूल होऊ दे. मोकळेपणाने हसत जा. हसतमुख मनुष्य नेहमीच इतरांना आनंद देतो.
👉 अस्थिरता – एखाद्या महत्त्वाच्या बाबीवर निश्चित निर्णय घेण्याची कुवत फारच थोड्या लोकांमध्ये असते. त्यांना स्वतंत्र सारासार विवेकशक्ती नसते. कोणतीही गोष्ट लांबणीवर टाकण्याची त्यांची प्रवृत्ती असते. अशाने संधी निघून जाते. तवा निवल्यावर उपयोग नाही. बैल गेला नि झोपा केला, अशातला प्रकार व्हावयाचा. एखाद्या गोष्टीचा पूर्ण विचार करुन तुम्ही सत्वर निर्णय घ्यावयास हवा नि इच्छाशक्ति एकवटून तो अंमलात आणावयास हवा, तर तुम्हाला यश प्राप्त होत जाईल. नुसत्या विचाराच्या अतिरेकाने कार्यहानी होईल. महत्त्वाच्या बाबीवर श्रेष्ठांचा विचार घेत चला. ज्यांचा विचार घ्यावयाचा अशी श्रेष्ठ नि ज्येष्ठ अनुभवी व्यक्तींकडे आपल्या मनातील विचार जरुर सांगा अशी माणसे तुमचे हित चिंतणारी जरुर सल्ला देतील.
👉 बेफिकीरी नि विसरभोळेपणा– यश प्राप्तीच्या मार्गातील हे दोन अडथळे आहेत. अशा माणसाजवळ योजना नि चिकाटी यांचा अभाव असावयाचाच. दक्षता तर नाहीच. कुठे किल्ली हरव, कुठे मोबाईल विसर, नाहीतर ऑफिसमधील महत्त्वाचे कागदसुध्दा आयत्यावेळी अशा विसरभोळे व्यक्तींना लवकर सापडत नसतात. स्मरणशक्तीची साधना करा असले गुण असतील तर काढून टाकण्याचा दृढनिश्चय करा.
👉 स्वतःवरील विश्वास- कित्येक माणसे मोठ्या कुवतीची असतात. त्यांच्यात कर्तृत्व असते, कला, असते, परंतु आत्मविश्वासाच्या अभावाने मागे पडतात. व्यवस्थित अभ्यास केलेला वक्ताही आत्मविश्वासाच्या अभावाने अनवस्था प्रसंग ओढवून घेतो. व्यवसायामध्ये तर आत्मविश्वासची खरी गरज क्षणोक्षणी लागते याउलट आत्मविश्वास जर नसेल तर तो अयशस्वी होतो. आत्मविश्वासाचा अभावामुळे कार्यसिध्दी होणे कठीण. आत्मविश्वास हेच निम्मे यश हे लक्षात ठेवा.
👉 अति लोभ- प्रामाणिक माणसे फारच कमी असतात. हाव नि लोभ यामुळे बेईमानी व लाचलुचपतपणा निर्माण होते. जेथे बेइमानी, तेथे दुटप्पीपणा, फसवणूक, अफरातफर आणि लाच घेणे इत्यादी प्रकार आलेच. केवळ अतिलोभामुळे बेइमानी व लाच घेणे कारभार केले जातात. बेइमानी माणसाची कुठल्याच क्षेत्रात भरभराट व प्रगती होणारच नाही. आज ना उद्या अशा माणसाचे बेइमान व लाच घेण्याचे उघडकीला येणारच. अशा व्यक्तीची समाजाकडून तिरस्कृत होईल. अशा या बेईमानांचा तुमच्या व्यक्तिमत्वाला स्पर्श न व्हावा याची दक्षता तुम्ही घ्या. अंथरुण पाहून पाय पसरा. प्रामाणिक रहा, समाधानी व्हा. हव्यास टाका. साधे जीवन जगा. तुमचे विचार उदात्त असावेत कारण यशाला याच गोष्टीची खरी गरज आहे.

👉 द्वेष एकमेकांचा द्वेष केला जाणे ही अत्यंत वाईट प्रवृत्ती आहे. द्वेषचे उच्चाटन करण्यासाठी लहानपणापासूनच असे चांगले संस्कार होणे अत्यंत जरुरीचे आहे. शुध्दप्रेमाचा विकास केल्याखेरीज, द्वेषभाव नष्ट होणार नाहीत. द्वेषभाव नाहीसा करण्याचा कळकळीने प्रयत्न करा.
👉क्रोधाला जिंकणे आपण प्रत्येकजण कमी वा जास्ती प्रमाणात या भयकंर शत्रूचे गुलाम आहोत. क्रोधाचा मज्जातंतूवर होणारा परिणाम हा भयंकर स्वरुपाची मनोविकार मुळासकट नाहीसा करण्याच्या निरनिराळ्या पध्दती यांचाच थोडा विचार येथे केल्यास क्रोध म्हणजे मनाची रजोगुण नितमोगुणापासून निर्माण झालेली वृत्ति. केवळ एखादी गोष्टी मिळाली नसल्यामुळे क्रोध संभवतो. क्रोध आपल्या बरोबरच अष्ट दुर्गणांचा जन्म देतो. हे आठ दुर्गुण म्हणजे अन्याय, अदूरदर्शीपणा, गांजणूक करणे, मात्सर्य, लुबाडणे, खून, क्रौर्य, शिवीगाळ एक क्रोध जर नाहीसा केला तर हे बाकीचे दुर्गुणही नाहीसे झालेच. क्रोधामुळे माणसाचा विलक्षण शक्तिनाश होत असतो. क्रोध निर्माण झाला की, मज्जातंतूना विलक्षण धक्का बसतो. डोळे लाल होतात. शरीर कंप पावते. मग त्याला आवरणे कठीण होते अशावेळी क्षणार्धात महाभयंकर कृत्ये घडून येतात. आपण काय करतो हेच त्याला कळत नाही. चिडीने बोललेला एक शब्द काय करु शकत नाही? भांडण, खून, मारामाऱ्या अशा प्रकारातूनच उद्भवतात. एखाद्या क्षुल्लक गोष्टीवरुन रागाला येणे हे कमकुवत मनोवृत्तीचे लक्षण आहे. अज्ञान नि अहंकार ही क्रोधाची मूलकारणे आहेत. त्याना नाहीसे करण्यानेच क्रोधावर पूर्ण ताबा मिळवता येईल.

एखाद्याने तुमची खोडी काढली नि तुम्ही शांत राहू शकला तर ती गोष्ट तुमच्या अंतःसामर्थ्याची द्योतक म्हणावी लागेल. संयम वा निग्रह हे मनाच्या महासामर्थ्याचेच चिन्ह असून व्यवसायातील व्यक्तिमत्वात अशा संयमतेची खूपच गरज असते. नेहमी सुसंवाद करताना ज्या ज्या वेळी चीड निर्माण होण्याचे चिन्ह दिसेल त्यावेळी बोलणे बंद करा नि मौन आचरा. नित्य एखादा तास मौन आचरणे क्रोधावर ताबा मिळविण्याच्या दृष्टीने हितकारक आहे. मन ताब्यात आले की, क्रोध उरत नाही. कारण जीभ हे भलतेच तीक्ष्ण हत्यार आहे, हे लक्षात ठेवा.
👉काळजी, चिंता नि धास्ती- काळजी, चिंता व धास्ती ह्या सर्व गोष्टी केवळ अज्ञानाने निर्माण होणाऱ्या असून सर्व मनाच्या निर्मिती आहेत. केवळ अज्ञान नष्ट झाले की, त्याबरोबरच या गोष्टीही नाहीशा होतातच. कुठल्याही गोष्टीचा जास्त बाऊ करुन काळजी करीत बसू नका, व्यवसायात पाऊल टाकायचे अगोदर माझे व्यवसाय चालेल का? याची काळजी टाकण्या अगोदरच आपणास काळजी लागते. मालक आपल्या नोकराला पैसे भरणा करण्यासाठी बँकेत पाठवितो, पण तो पैसे भरून परत येईल की नाही ही काळजी विनाकारण घेत असतो.
चिंताग्रस्त मन जत्रेतील चक्रासारखे आतल्या आत फिरत असते आणि चिंतामूलक विचार एकामागोमान एक असे मनात निर्माण होत असतात नि त्याला गति देत असतात. अतिचिंताग्रस्त झालेल्या माणसाचे केस अगदी थोड्या काळातच पांढरे होतात. चिंतेने मेंदू, मज्जा, पेशी यांची शक्ती कमी कमी होत जाते. दमणूक, अपचन, शक्तिपात, रक्तक्षीणता इत्यादी गोष्टींचा उद्भव चिंतेमुळेच होतो. चिंतेच्या जोडीला भय नि क्रोध असल्यास त्या माणासाचा तत्काल नाश होतो. आयुष्य नि इच्छाशक्ती कमी होण्याचे कारण चिंता आणि बऱ्याच रोगांचे मूळ चिंताच होय.
चिंताविरहीत मनुष्यच एकाग्र चित्ताने कोणतेही चांगले काम करु शकेल. कोणत्याही गोष्टीबाबत चिंता, क्रोध व धास्ती करीत बसू नका. नेहेमी उत्साही मनाने काम करा. चातुर्य व दूरदृष्टी यांचा तुमच्या ठायी विकास घडवून आणा. धोके नि अपयश यांना तूम्ही दूर ठेवू शकाल. पक्षी किती आनंदाने नि निष्काळजीपणाने संचार करीत आहेत, ते बघा, पक्ष्याप्रमाणे चिंतामुक्त व्हा.
👉भितीवर विजय मिळवा भीती ही मनाची विकृती आहे. भीती हा निषेधात्मक गुण आहे. अज्ञानामुळे ही विकृती निर्माण होते. प्रत्येक गोष्टीला मला जमेल का? माझा व्यवसाय चालेल का? मला काम, ग्राहक, पैसा मिळेल का? मी परिक्षेत पास होईल का? अशा अनेक गोष्टींचा आपण केवळ भीतीची विकृती मनात निर्माण करीत असतो. भीती, चिंता, क्रोध या गोष्टींनी माणसाचा शक्तिपात होतो त्यामुळे मनुष्य लवकर अपयशी ठरतो.
पालकांनी नि शिक्षकांनी लहानवयातच आपल्या मुलांना धैर्याचे धडे दिले पाहिजेत. लहानवयातच मुलांची मने संस्कारक्षम असल्याने ती बनवावी तशी बनतात. आपल्या मनात धैर्याचा विकास केल्यास तुमची इच्छाशक्तीही तुमच्या मदतीला येईल. धीट व्हावे अशी तुम्ही इच्छा केली तर त्याबरोबरच लवकरच तसा निर्धारही तुमच्या मनात निर्माण होईल.
👉वाईट सवयींचा गुलाम – एखादी गोष्ट ही नेहमी एकाच स्वरुपात केल्यामुळे ती आपल्या सवयीचा भाग बनते. एखादी सवय जडल्यानंतर ती सवय त्या मनुष्याच्या जीवन प्रवाहाचा ताबा घेत असते. हे कलियुग आहे. हे शास्त्रीय शोधांचे युग आहे. त्याचबरोबर फॅशनचे नि जीवनविषयक खोट्या मूल्यांचे हे युग आहे. ही आजची संस्कृती आहे. आजच्या फॅशनच्या आधुनिक संस्कृतीत जसे चांगली प्रगती इालेली दिसून येते, तसे या आधुनिकतेच्या युगात वाईट सवयी ही निर्माण झालेले दिसून येतात. जसे नाण्याला दोन बाजू असतात. एखादी वाईट सवयीमुळे शरिराची, मनाची व व्यवसायाची अतोनात हानी होत असते त्याकरिताच सुरुवातीपासूनच अशा वातावरणात व गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे. तुम्हाला कौटुंबिक व व्यावसायिक जीवनात प्रगती साधावयाचे असल्यास अशा वाईट सवयी मनात देखील विचार हानू नका. कारण प्रगतीतील मोठा अडथळा म्हणजे वाईट सवय, त्याला दूर फेका. तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्या अंगी चांगल्या सवयी व शिस्त असणे अत्यंत गरजेचे आहे. नेहमीच चलता है असा दृष्टीकोन न ठेवता चलता नाही असा दृष्टीकोन ठेवा आणि पाहा तुमची चलती होते की नाही.
🙏व्यावसायिक व्यक्तिमत्व विकास घडवितांना अशा आपल्या अंतर्मनातील अडथळ्यांना सुरुवातीलाच लांब ठेवा किंवा दूर फेकून द्या. लहान पणापासूनच रचनात्मक, शक्तिदायी व सहाय्यक विचारांना तुमच्या मेंदूत प्रवेश करु द्या. जेथे इच्छा तेथे मार्ग सापडतोच.
केल्याने होत आहे रे । आधी केलेची पाहिजे ॥ यत्न तो देव जाणावा । अंतरी धरिता बरे ॥
⚡⚡⚡⚡☔☔☔
शिक्षण व संस्कार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिक्षणातून चांगले संस्कार होत असतात तर संस्कारातून शिक्षण होत असते. संस्कार ही अशी बाब आहे की, ज्याच्या सान्निध्यात मानव जातो, त्याठिकाणी तो संस्कारीत व जीवनात यशस्वी होतो.